Sangli Accident: टेम्पोची मोटारीस धडक; एकाचा गाईसह मृत्यू 
सांगली

Sangli Accident: टेम्पोची मोटारीस धडक; एकाचा गाईसह मृत्यू

दूधगाव येथील घटना : टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावर टेम्पोने मोटारीसह रस्त्याकडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला आणि गाईला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा आणि गाईचा जागीच मृत्यू झाला असून, मोटार चालक डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.शंकर रामाप्पा पाटील (वय ५५, रा. शहापूर, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे.

डॉ. पवन नामदेव शेळकंदे (वय २६, मूळ रा. पुणे, सध्या रा. आष्टा) हे आपल्या मोटारीतून कवठेपिरानहून दुधगावमार्गे आष्टा येथे जात होते. दुधगावच्या हद्दीत समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चालकाने कारला जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की, टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभे असलेले शंकर पाटील यांना फरफटत नेऊन आणि झाडाला बांधलेल्या गाईलाही उडवले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने शंकर पाटील यांचा तसेच ५० हजार रुपये किमतीच्या गाईचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चौकशीत टेम्पोचालक दारुच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्याबद्दल टेम्पो चालक आदर्श संभाजी शिंगाडे (वय २२, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT