Temperature Pudhari
सांगली

Sangli temperature: सांगलीत तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यावर

सांगलीसह जिल्ह्यात उष्णतेचा कहर झाला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेचा प्रभाव जाणवत असून, तापमानाचा पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीसह जिल्ह्यात उष्णतेचा कहर झाला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेचा प्रभाव जाणवत असून, तापमानाचा पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तीव्र उन्हामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत शहरात अक्षरशः ‌‘अघोषित बंद‌’ असल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून, बाजारपेठा ओस पडताना दिसत आहेत.

दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ जाणवण्याइतपत कमी आहे. चौकांमधील वाहतुकीचे सिग्नल सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत बंद ठेवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत; पण त्याबाबत वाहतूक शाखेकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. रस्त्यावर, शेतात, बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना फारच उन्हाचा त्रास सोसावा लागतो आहे.

दिवसाच्या उन्हाचा रात्री त्रास

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून तत्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. दिवसभराच्या प्रखर उन्हामुळे रात्री आठ वाजेपर्यंत उकाडा कायम जाणवत आहे.

पारा खाली येणारच नाही

तापमानाचा अंदाज (अंश सेल्सिअसमध्ये) : सोमवार (दि. 27) कमाल 39, किमान 24, मंगळवार 39-24, बुधवार 39-23, गुरुवार 38-23, शुक्रवार 38-23, शनिवार 39-23, रविवार 38-22, पुढील सोमवारी 38-22.

आरोग्यावर परिणाम...

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे. उष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) यासारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनीही दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन प्रशासनानेही केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT