आटपाडीः आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेचे काम करताना अधिकारी व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराने होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण आज पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले. माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या आग्रहास्तव आंदोलकांनी हे आंदोलन स्थगित केले.
दिघंची येथील शेखर सावंता रणदिवे, नवनाथ मधुकर रणदिवे, बळीराम मधुकर रणदिवे, अशोक लक्ष्मण पवार, राहुल मगर बुधावले यांनी टेंभूच्या कामातील भ्रष्टाचाराच्या विरोधात 13 जानेवारी पासून आंदोलन सुरु केले होते. आज नवनाथ रणदिवे यांची तब्बेत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पाच दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान उपअभियंता शिवाजी पाटील यांच्यावर आंदोलकांनी थेट आरोप केला. वैद्यकीय रजेवर जाऊन त्यांनी आंदोलनाला पद्धतशीर बगल दिली. वरिष्टांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत असल्याचा देखील आरोप करण्यात आला.
आज ब्रम्हानंद पडळकर यांनी तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या उपस्थितीत आंदोलकांशी चर्चा केली. पडळकर यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. आंदोलकांनी त्याला प्रतिसाद देत टेंभू योजनेतील भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होत नाही, आणि उपभियंता शिवाजी पाटील व त्यांचे सहकारी जे.ई.जाधव यांचे निलंबन होत नाही. योजनेचे पाणी मिळत नाही तो पर्यंत आमचा लढा हा चालूच राहील असा इशारा देत उपोषण स्थगित करण्यात आले.