Sangali news  
सांगली

Sangli Irrigation Project Fraud | टेंभू योजनेत महाघोटाळा? सरकारी पाईपलाईनमध्येच खासगी ‘घुसखोरी’

शासकीय योजनेची खासगी मालमत्तेसारखी लूट सुरू असल्याचेही समोर आले आहे

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : दुष्काळी आटपाडीची जीवनवाहिनी असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेत भ्रष्टाचाराचे 'पाणी' शिरल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दिघंची–निंबवडे लाईनच्या पाहणीदरम्यान सरकारी बंदिस्त पाईपलाईनच्या चारीमध्येच चक्क खासगी पाईपलाईन टाकून पाणी चोरीचा घाट घातल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संतापलेले भाजप नेते ब्रम्हानंद पडळकर यांनी टेंभूच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले.

नेमका प्रकार काय?

झरे येथील गट क्रमांक ६१६, ६१० आणि ५७४ मध्ये शासनाच्या कोट्यवधींच्या प्रकल्पात नियमबाह्य हस्तक्षेप झाला आहे. सरकारी पाईपलाईनसाठी खोदलेल्या चारीचा वापर करून काही जणांनी स्वतःची खासगी लाईन टाकली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार उघड होऊनही अधिकाऱ्यांनी केवळ नोटीस बजावून आठ दिवसांची मुदत दिल्याने, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट होत आहे.

भ्रष्टाचाराचा 'बंदिस्त' कारभार

ब्रम्हानंद पडळकर यांनी पुराव्यासह अधिकाऱ्यांसमोर मांडलेले काही गंभीर मुद्दे मांडले आहेत. दिघंची–निंबवडे लाईनवर भिंती बांधणे, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही त्यांची कोट्यवधींची बिले काढण्यात आली आहेत. नियमानुसार एका वितरिकेवर ५ आऊटलेट असणे आवश्यक असताना, तिथे १० ते १५ आऊटलेट देऊन ठराविक लोकांना झुकते माप देण्यात आले आहे. एकाच लाईनमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनागोंदी असेल, तर संपूर्ण तालुक्यातील कामात किती मोठा भ्रष्टाचार असेल? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

"शासकीय योजनेची खासगी मालमत्तेसारखी लूट सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे प्रकार घडत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही."
— ब्रम्हानंद पडळकर (माजी सभापती व भाजप नेते)

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी वर्षानुवर्षे वाट पाहत असताना, दुसरीकडे मात्र योजनेच्या कामात सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे आटपाडी तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT