आमदार रोहित पाटील File Photo
सांगली

Sangli News : टेंभू विस्तारित योजनेला ६१९ कोटी निधी

आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; वंचित गावांना हक्काच्या पाण्याची आशा

पुढारी वृत्तसेवा

मळणगाव : तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातील सिंचनापासून वंचित असणाऱ्या गावांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. टेंभू विस्तारित सिंचन योजनेसाठी तब्बल ६१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, याबाबतचा शासन निर्णय १९ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे. आमदार रोहित पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून शासन आणि जलसंपदा विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यामुळे निर्णायक यश मिळाले आहे.

टेंभू विस्तारित योजनेत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित गावांचा समावेश व्हावा, यासाठीचा संघर्ष २०२३ पासून सुरू होता. तत्कालीन आमदार सुमन पाटील आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. टेंभू विस्तारित योजनेला मंजुरी देतानाच वंचित गावांचा समावेश करावा, अशी ठाम मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती.

मार्च २०२५ पासून टेंभू योजनेच्या टप्पा ५ व ६ ची कामे संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी शेतकरी व नागरिकांकडून येत होत्या. कामांना गती देण्यासाठी नाबार्डच्या कर्ज निधीतून आर्थिक तरतूद करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. निधी उपलब्ध करून देऊन कामांना गती द्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बैठका, निवेदने, प्रत्यक्ष पाहणी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करत त्यांनी हा प्रश्न लावून धरला. अखेर शासनाने ६१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्याच आठवड्यात आमदार रोहित पाटील यांनी विस्तारित टेंभू योजनेच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. आता निधी उपलब्ध झाल्याने कामांना आणखी वेग मिळेल आणि सप्टेंबर २०२७ ची निर्धारित मुदत लक्षात घेऊन कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हा निधी केवळ शासकीय मंजुरी नसून, पाण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळच्या शेतकऱ्यांच्या आशेला मिळालेले मोठे बळ मानले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. विस्तारित टेंभू योजनेची कामे वेगाने पूर्ण व्हावीत, यासाठी शासन आणि जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आता ६१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या कामांना मोठे बळ मिळाले आहे. सिंचनापासून वंचित गावांना हक्काचे पाणी मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील.
- रोहित पाटील, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT