पालकमंत्री चंद्रकांत पाटील 
सांगली

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी टास्क फोर्स

पालकमंत्री चंद्रकांत पाटील : विटा ड्रग्जप्रकरणी गुन्हेगारांना मकोका लागणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कायद्याचा धाक वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्समध्ये सहा पोलिस उपअधीक्षकही असतील. दरम्यान, विटा ड्रग्जप्रकरणी सर्व गुन्हेगारांना मकोका लागेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ते म्हणाले, सांगली-मिरजेत शनिवारी एकाच दिवशी दोन खून झाले. कारण घरगुती का असेना, पण जिल्ह्यात गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारी वाढण्याची कारणे काय, कायद्याचा धाक कमी झाला आहे का, पोलिसांची संख्या वाढवावी लागेल काय, पोलिस चौक्या वाढवाव्या लागतील काय, गस्त वाढवावी लागेल काय, याबाबत हा टास्क फोर्स पुढील आठवड्यात पहिला अहवाल सादर करेल. पोलिस वाहने, गस्ती वाहने वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद केली जाईल. शाळा, महाविद्यालयांमधील हिंसाचार रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यासाठी उपाययोजना करता येईल. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्याही वाढवता येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाईल. जादाच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

माहिती देणार्‍यांना दहा हजारांचे बक्षीस

ते म्हणाले, ड्रग्जबाबत नियुक्त टास्क फोर्सचा दर सोमवारी आढावा घेतला जात आहे. त्याचे परिणाम दिसत आहेत. गांजा, नशेच्या गोळ्या, ई-सिगारेट हस्तगत केल्या आहेत. संबंधितांवर कारवाई झाली आहे. ड्रग्ज, नशेबाजीविरोधात कारवाईत अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचे आढळल्यास त्यास निलंबित केले जाईल. ड्रग्ज, नशेच्या साहित्याबाबत गोपनीय माहिती देणार्‍यांना 10 हजार रुपये बक्षीस दिले जाईल. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, माजी महापौर संगीता खोत, केदार खाडिलकर, विश्वजित पाटील उपस्थित होते.

नशाविरोधी प्रतिज्ञेनंतर भरणार शाळा

ते म्हणाले, जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये रोज नशेविरोधात प्रतिज्ञा होईल व त्यानंतर शाळा भरेल. त्यासंदर्भात शिक्षण विभागाची परवानगी घेतली जाईल. नशेविरोधी जिंगल्स बनवले जातील. त्याचा अधिकाधिक प्रसार करण्यात येईल. प्रबोधनाबरोबरच छापेही टाकले जातील. नशेबाजीविरोधात जिल्ह्यात सुरू केलेली मोेहीम मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतली आहे. ते सर्व पालकमंत्र्यांना या मोहिमेबाबत सूचना देणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT