तासगाव : तासगाव-सांगली मार्गावर एका हॉटेलसमोर डंपर, चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. बालेखान गुलाब तांबोळी (रा. खरसुंडी, ता. आटपाडी) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीहून तासगावकडे येत असलेल्या डंपरच्या (एम.एच. 10 डीटी 5133) पाठीमागून एक मोटार जात होती. यावेळी बालेखान तांबोळी हे पत्नीसह दुचाकीवरून (एम.एच. 10 सीई 0871) खरसुंडीहून सांगलीस जात होते. त्यांच्यासमोर एक मोटार होती. ही तिन्ही वाहने एका हॉटेलजवळ आली असता, तांबोळी यांच्यासमोरील मोटारीच्या चालकाने अचानक मोटार थांबवली. त्यामुळे बालेखान यांची दुचाकी पुढील मोटारीवर आदळली. या धडकेने बालेखान आणि त्यांची पत्नी रस्त्यावर पडले. त्याचवेळी समोरून येणार्या डंपरची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात बालेखान यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
अपघातानंतर चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पळून जात असताना, इतर वाहनचालकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातामुळे तासगाव-सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहने बाजूला काढली आणि वाहतूक पुन्हा सुरू केली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.