Bribery Case Pudhari
सांगली

Sangli Bribery Case : लाचखोरीच्या संभाषणाने ‌‘महसूल‌’चे रेटकार्डच चव्हाट्यावर

सौदेबाजीचे जाळे घट्ट : अनेक तलाठी कार्यालयांचा ताबा झीरो तलाठ्यांकडे

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल चव्हाण

तासगाव : शिरगाव (विसापूर) येथील तलाठी कार्यालयातील खासगी इसम संजय पवार याच्या लाचखोरीचे भ्रमणध्वनीवरील संभाषण समाजमाध्यमावर सामायिक झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. संभाषणातून महसुलाचे रेटकार्डच समोर आल्याने ‌‘महसूल‌’ची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संजय पवार याला मुदत खरेदीदस्त नोंद करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर तक्रारदार शेतकरी आणि संशयित संजय पवार यांच्यात झालेले संभाषण सामायिक झाले आहे. महसूल विभागात नोंदींसाठी ठराविक ‌‘रेटकार्ड‌’च चालत असल्याचे या संभाषणातून समोर आले आहे. या कॉल रेकॉर्डमध्ये संशयित पवार हा, अण्णासाहेबांचा पाच हजारांचा आकडाच नाही, नोंदीसाठी 15 हजार रुपये घेतले जातात, तुमची परिस्थिती नाही म्हणून सांगतो तुम्ही 12 हजार रुपये द्या, असे सांगताना ऐकू येते.

महसूल विभाग आणि लाचखोरी नवीन नाही. साध्या नोंदीपासून विविध महसुली कामाबरोबर शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी पैशाची उघड मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. गोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी नागरिकांना विविध कामासाठी लागणारे सात-बारा, फेरफार यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते.

जेरीस, जेरीस आणतात ओ...

तहसील कार्यालयात दलालामार्फत जाणाऱ्यांचे काम काही वेळातच होते, पण जो सरळ मार्गी जातो, त्याच्या कामात नसणाऱ्या त्रुटी काढून त्याला जेरीस आणले जाते.

  • तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयांमध्ये ‌‘झीरो तलाठी‌’ आणि खासगी इसम हेच तलाठी यांचे बहुतांशी काम करतात.

  • तलाठी हे अनेक वेळा तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामाचे निमित्त सांगून दांडी मारत असतात.

  • तलाठी हे नावापुरते अधिकारी राहिले आहेत. प्रत्यक्ष कामकाज झीरो तलाठ्यांच्या हाती असल्याचे नागरिक सांगतात.

  • तलाठी कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज आणि शासकीय कागदपत्रे या खासगी इसमाच्या (झीरो तलाठी) ताब्यात असतात, तोडपाणी पण तोच करीत असतो, याची उघड चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT