तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने पंचायत समितीचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. विविध विभागांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवत असून, कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
पंचायत समितीची जुनी इमारत जीर्ण व वापरण्यास धोकादायक झाल्याने ती पाडून त्याच ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला १५ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत होती. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. तरीही इमारतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी पंचायत समितीच्या विविध विभागांची कार्यालये उपलब्ध जागांमध्ये सुरू करण्यात आली. त्यामुळे कार्यालयांची विभागणी वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहे. काही कार्यालये गटविकास अधिकारी, सभापती आणि उपसभापती यांच्या कार्यालयांपासून दूर आहेत. परिणामी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी धावपळ करावी लागत आहे.
ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित कार्यालय शोधण्यातच बराच वेळ खर्च करावा लागतो. कार्यालय सापडल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित असतीलच, याची खात्री नसते. अधिकारी-कर्मचारी कुठे आहेत, ते कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले आहेत का, याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय कारभारात अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण आणि कामकाजातील समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विविध विभागांतील विस्कळीतपणाचा परिणाम नागरिकांच्या कामांवर होत असून, पंचायत समितीचा कारभार अधिक सुसूत्र करण्याची गरज व्यक्त होत आहे.