तासगाव पालिका सभेत पाणीप्रश्नावरून वादंग 
सांगली

Sangli News : तासगाव पालिका सभेत पाणीप्रश्नावरून वादंग

वाढीव पाणीपुरवठा योजनेसह अन्य विषयांना मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव नगरपालिकेची सोमवारी पार पडलेली मासिक सभा पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध विषयांनी गाजली. वाढत्या शहरासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना राबवणे आणि वासुंबे गावाला दिलेल्या पाण्याच्या थकबाकीची वसुली करणे यांसारख्या विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधकांत एकमत झाले. मात्र, व्यायामशाळेच्या जागेच्या हस्तांतरावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सर्कससिंह परशुराम माळी सभागृहात नगराध्यक्षा विजया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान व मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे उपस्थित होते.

सभेत जॅकवेल व फिल्टर हाऊसचे एनर्जी ऑडिट करणे, पाणी साठवण टाक्यांवर वॉटर लेव्हल इंडिकेटर बसवणे, सुधारित व वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करणे, बिगरघरगुती पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा करणे, दाणे गल्लीतील जुनी पाईपलाईन बदलणे, तसेच वासुंबे गावाकडील पाणीपट्टी थकबाकी व अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करणे या पाणीपुरवठ्याशी निगडित सर्व विषयांना सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, वरचे गल्ली येथील पालिका मालकीच्या जागेवरील व्यायामशाळा 'लक्ष्मी प्रतिष्ठान' या संस्थेला देण्याचा विषय पटलावर आला असता, विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती करत जोरदार हरकत घेतली. विरोधकांनी हा विषय रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्ताधार्‍यांनी बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT