सांगली

सांगली: तासगाव भूमी अभिलेखचा कारभार रामभरोसे; ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

अविनाश सुतार

तासगाव: पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार अनेक दिवसांपासून रामभरोसेच सुरु आहे. विविध कामासाठी या कार्यालयात येणा-या तालुक्यातील नागरिक आणि ग्रामस्थांना कार्यालयातून काम न होताच घरी परतावे लागते. आज (दि.२८) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी या कारभाराचा पंचनामा केला. कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी जर कारभार सुधारला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शहरातील दत्तमाळ भागामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील तळमजल्यावर भूमी अभिलेख कार्यालय आहे. तालुक्याच्या विविध गावातील नागरिक व ग्रामस्थ दररोज जमिनीची मोजणी करण्यासाठी पैसे भरणे, नकाशे काढणे आणि इतर कामासाठी येथे येत असतात. परंतू अनेक दिवसांपासून या कार्यालयात अधिकारी-कर्मचारीच उपस्थित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी थेट भूमी अभिलेखचे कार्यालयच गाठले. यावेळी कार्यालय प्रमुखासह जवळपास ८० टक्के खुर्च्या रिकाम्याच होत्या. सकाळी हजेरी लावून अधिकारी व कर्मचारी बाहेर कुठेतरी गेले होते. प्रदीप माने यांनी विचारणा केली असता उपस्थित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. आक्रमक झालेल्या प्रदीप माने यांनी कारभार सुधारला नाही. तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करुन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सळो की पळो करुन सोडू, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT