Crime Pudhari
सांगली

Sangli Crime : कवठेएकंदजवळ कराटे प्रशिक्षकावर हल्ला

अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठविल्याचा आरोप; भररस्त्यात चोप

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव शहरातील एका मंगल कार्यालयात कराटे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना तासगाव-सांगली रस्त्यावर कवठेएकंद (ता. तासगाव) गावाजवळ गुरुवारी दुपारी घडली. हल्ल्यात प्रशिक्षक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात सुरू होती.

संबंधित कराटे प्रशिक्षक गेल्या एक वर्षापासून तासगावातील एका मंगल कार्यालयात मुला-मुलींना कराटेचे धडे देत आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला हा प्रशिक्षक गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला त्रास देत होता. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड भयभीत होती. तिने अखेर हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

मुलीच्या भवितव्याचा विचार करून नातेवाईक सुरुवातीला या प्रशिक्षकाला केवळ समजावून सांगण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, तो गेल्या तीन दिवसांपासून त्यांना चकवा देत होता. गुरुवारी सकाळी मोबाईलवरून त्याचा संपर्क झाल्यानंतर तो आपल्या गावी निघाला असल्याचे समजले. नातेवाईकांनी त्याला कवठेएकंद गावाजवळ गाठले. यावेळी अश्लील मेसेजबाबत जाब विचारताना दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या नातेवाईकांनी प्रशिक्षकाच्या पाठीत चाकूने वार केले, तर एकाने डोक्यात वीट मारून त्याला जखमी केले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने संबंधित प्रशिक्षक जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT