तासगाव : तासगाव येथील बस स्थानकात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या प्रवासी महिलेच्या पर्समधील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ज्योती हणमंत खुजट (वय 31, रा. केशवनगर मांजरी, पुणे, सध्या रा. हातनूर, ता. तासगाव) यांनी यासंदर्भात तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती खुजट या आपली नणंद प्रणोती यांच्यासह पुणे येथून स्वारगेट-तासगाव बसने आल्या होत्या. तासगाव बस स्थानकातून सासरी हातनूर येथे जाण्यासाठी त्या दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तासगाव-मेंगाणवाडी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. या गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने ज्योती यांच्या पर्समध्ये असलेली दागिने ठेवलेली डबी अलगद लांबवली.
या डबीत एक लाख रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने होते. ज्योती या हातनूर येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांनी आपली पर्स तपासली असता, त्यांना दागिन्यांची डबी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही डबी न सापडल्याने त्यांनी अखेर तासगाव पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेत आहेत.