तासगाव : तासगाव शहरातील विटा रोडवरील गणेश कॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह ४० हजार रोख रक्कम असा २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. माया कमलाकर पिंपरे (वय ४८) यांच्या घरी ही चोरी झाली. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माया पिंपरे या स्वयंपाकी म्हणून काम करतात आणि गणेश कॉलनीतील घरी एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे २०१६ मध्ये निधन झाले असून, मुलगा कामानिमित्त मुंबई येथे राहतो. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी त्या घराला कुलूप लावून कामावर गेल्या होत्या. दरम्यान, सोलापूर येथे नातलगाचे निधन झाल्याने त्या घरी न परतता थेट सोलापूरला गेल्या. १५ रोजी दुपारी त्या तासगाव येथे परतल्या. त्यावेळी त्यांना दरवाजाचे कुलूप खाली पडलेले दिसले. दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मागील बाजूला जाऊन पाहिले असता, तेथील दरवाजाची कडी काढल्याचे लक्षात आले. घरात हॉल आणि बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आणि कपाटाचे लॉकर उघडे असल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी कपाटातून ७५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, ५५ हजार रुपये किमतीचा ११ ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, २५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुबे, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले आणि ४० हजार रुपये रोख, असा २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तासगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.