तासगावच्या गणपतीचा २४५ वा पारंपरिक रथोत्सव रविवारी (दि. ८) साजरा होत आहे.  Pudhari News Network
सांगली

तासगावचा ऐतिहासिक 'गणेश रथोत्सव'; जाणून घ्या इतिहास आणि परंपरा

पुढारी वृत्तसेवा
प्रमोद चव्हाण

तासगाव : संपूर्ण महाराष्ट्रात जागृत गणपती म्हणून प्रसिध्द असणारा तासगावचा उजव्या सोंडेचा गणपती. हेमाडपंथी मंदिर आणि लोकोत्साही परंपरेने गेली २४४ वर्षे साजरा केला जाणारा येथील रथोत्सव गणेश भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व सीमाप्रांतातही हा रथोत्सव सुप्रसिद्ध आहे. या भागातील लाखो लोक या रथोत्सवासाठी एकत्र येतात. रविवारी (दि. ८) या गणपतीचा २४५ वा पारंपरिक रथोत्सव (Tasgaon Ganpati Rathotsav) साजरा होत आहे. त्यानिमित्ताने...

परशुरामभाऊ पटवर्धन गणेशभक्त

तासगावचे तत्कालीन संस्थानिक व मराठा साम्राज्याचे तत्कालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन हे गणेशभक्त होते. त्यांनी इ. स. १७७१ ते १७७९ या नऊ वर्षांच्या काळात तासगाव येथे सुंदर असे हेमाडपंथी गणेश मंदिर बांधले. सन १७७९ मधे फाल्गून शुद्ध चतुर्थी या शुभदिनी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना केली. लोकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, यासाठी तेंव्हापासूनच तासगावमध्ये हा रथोत्सव (Tasgaon Ganpati Rathotsav) लोकांच्या अलोट उत्साहात साजरा होत आहे.

परशुराम पटवर्धन यांनी तासगावातील गणपतीचे मंदिर बांधले

संस्थानिक पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष पुण्यश्‍लोक हरभट (बाबा) पटवर्धन हे एक अवतारी पुरुष होते. ते गणपतीपुळ्याच्या गणपतीचे भक्त होते. अनेक वर्षे त्यांनी श्रींची उपासना केली होती. पुढे त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यावेळी त्यांना झालेल्या दृष्टांतात घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकण प्रदेशाचा निरोप घेण्याचे ठरवले. प्रवासादरम्यान त्यांनी इचलकरंजी येथे मुक्काम केला. यावेळी तेथे त्यांची भेट पेशवेकालीन सरदार इचलकरंजीकर घोरपडे यांच्याशी झाली. त्यांनी हरभट बाबांच्या सहा मुलांची पुण्याला पेशवे दरबारी नेमणूक केली. या सहा मुलांपैकी रामचंद्रपंत हे शास्त्र तेजात निपुण होते. त्यांचे चिरंजीव परशुराम पटवर्धन यांनीच तासगावातील गणपतीचे मंदिर बांधले.

परशुरामभाऊ पटवर्धन म्हणजे ‘सर्वात विश्‍वासू मराठा सरदार’

श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन हे संस्कृत पठण, शास्त्र विद्या, पत्रलेखन व रणांगणातील मर्दमुकी यात निपुण होते. तत्कालीन ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेलस्की यांनी भाऊबद्दल ‘सर्वात विश्‍वासू मराठा सरदार’ असे उद्गार काढले आहेत. या थोर सेनापतीस थोरले माधवराव पेशवे यांनी पानीपतच्या पराभवानंतर मराठी साम्राज्याचे पुनर्गठन करण्यासाठी मिरज प्रांत कसबे तासगावचे संस्थानिक म्हणून नेमणूक केली. (Tasgaon Ganpati Rathotsav)

श्री गणेशाचा दृष्टांत अन् तासगावातच श्रींची प्रतिष्ठापना

तासगाव संस्थानची मुहूर्तमेढ इ. स. १७६५ मध्ये रोवली. पटवर्धन घराण्यात ‘श्री’ भक्तिचा वारसा आणि परंपरा होती. आजोबा हरभट बाबा यांच्याकडून परशुराम भाऊंना गणेशभक्तीचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे ते गणपतीपुळे येथील श्रींच्या दर्शनासाठी जात असत. एकदा गणेशाने त्यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला व तासगावातच श्रींची प्रतिष्ठापना करण्याचे सांगितले.

मंदिरासाठी कर्नाटक, राजस्थानातून कारागिर 

या दृष्टांतानंतर इ. स. १७७१ ते १७७९ या नऊ वर्षांच्या काळात तासगाव येथे सुंदर असे गणपती मंदिर बांधले गेले. परशुरामभाऊंनी विविध प्रदेशातील मंदिरांची पाहणी करुन हे मंदिर बांधले. कर्नाटकातून गवंडी, सुतार, शिल्पकार व राजस्थानातून चित्रकार आणले व मंदिराची उभारणी केली.

९६ फूट उंचीचे राज्यातील एकमेव गोपूर

या मंदिराची रचना भव्यदिव्य अशी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. समोर प्रवेशद्वार व देवस्थानची कचेरी आहे. पुढे पटांगण असून शेजारी सभागृह आहे. सात मजली ९६ फूट उंचीचे राज्यातील एकमेव गोपूर या मंदिराचे आहे. मंदिराच्या केंद्रस्थानी सिद्धिविनायक असून विष्णू, महादेव, सूर्यदेव व उमादेवी अशा ४ मूर्ती आहेत. उजव्या सोंडेचा गणपती हे तासगावच्या मंदिराचे वैशिष्ठ आहे.

रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात

श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी कर्नाटकात श्रीरंगपट्टण येथे पाहिलेल्या रथोत्सवाची कल्पना तासगाव येथे प्रथमच १७७९ मध्ये सुरु केली. तेंव्हापासूनच तासगावची भरभराट सुरु झाली. रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी गणेशभक्तांची भावना असते. म्हणूनच भाविक रथावर मोठ्या भक्तीभावाने पेढे, नारळ, गुलाल, खोबर्‍याची उधळण करत रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढत नेतात. या रथामध्ये संस्थानची पंचधातूची सिद्धिविनायकाची मूर्ती असते. श्रींचा रथ गुरूवार पेठेतील काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिरापर्यंत ओढतात. मिती भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी दुपारी बरोबर एक वाजता या रथोत्सवास सुरवात होते. या रथासमोर गणपती संस्थानचा हत्ती दिमाखात चालत असतो. पालखी, गुलाल, पेढे, खोबर्‍याची उधळण, मंगलमूर्तींचा जयघोष, झांजपथक यामुळे वातावरण भक्तिमय असते.

काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिरापर्यंत रथोत्सव

तरुण पिढी मानवी मनोरे उभारुन आनंद लुटते. ढोल, लेझिम पथके रथासमोर भक्तीभावाने आपले सादरीकरण करत असतात. काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिरापर्यंत रथ आल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीची आरती केली जाते. ( या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन केले जाते, असा गैरसमज आहे.) यानंतर रथ पुन्हा गणपती मंदिराकडे परतीच्या प्रवासास निघतो. रथ परत गणपतीच्या मंदिरापर्यंत ओढला जातो व रथोत्सव संपतो. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक मोठ्या श्रध्देने या रथोत्सवात सहभागी होतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इ. स. १८८५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र त्याआधी १०६ वर्षे आधीपासून तासगावमध्ये रथोत्सवाची परंपरा सुरु आहे. हा रथोत्सव म्हणजे तासगावच्या ऐतिहसिक, धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. पण तो सामाजिक ऐक्याचा केंद्रबिंदूही ठरला आहे.

दोरखंड बांधून रथ ओढला जातो

तासगावच्या या रथोत्सव (Tasgaon Ganpati Rathotsav) मिरवणुकीसाठी पूर्वी जो रथ वापरला जायचा. तो संपूर्ण लाकडी, देखणा, नक्षीदार असा होता. आता लोखंडी बनवलेल्या व केळीच्या पानांनी सजवलेल्या रथातून श्रींची मिरवणूक काढली जाते. या रथास मोठमोठे दोरखंड बांधून पूर्ण मिरवणूक होइपर्यंत हा रथ ओढला जातो. या उत्सवावेळी आबालवृद्धांकडून मोठ्या श्रध्देने गणेशाचा जयजयकार करतात. यावर्षी २४५ व्या या रथोत्सवास सुमारे एक लाखाहून अधिक भक्तगण हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रथोत्सवासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही जोरदार तयारी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT