कुपवाड : तानंग फाटा येथे डेंजर झोनचा कोणताही वापर न करता रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पवन जगदीश शर्मा (वय ३५, सध्या रा.शामरावनगर,सांगली.मूळ गाव बहोर ता. भलवणी जि.देवरीया उत्तरप्रदेश) असे मृत झालेल्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी , तानंग फाटा येथे शुक्रवार दि.३ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कोणतीही पार्किंग लाईट न लावता तसेच डेंजर झोनचा कोणताही वापर न करता रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर (एच.आर.१३,एस ४४७३) थांबला होता. थांबलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी (एम.एच.१०,बी क्यू ६६९९) चालकाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
जखमीला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. जखमी पवन शर्मा याचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत अनिल कुशवाह याने कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.