ईश्वरपूर : ताकारी-कराड रस्त्यावर ताकारी (ता. वाळवा)नजीक मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत पूनम जयवंत चव्हाण (वय ३४, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती जयवंत हणमंत चव्हाण (वय ३९) आणि मुलगा शौर्य (वय ११) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, दि. ६ रोजी सायंकाळी घडला.
याप्रकरणी मोटारचालक शिवाजी भिवाजी मरागजे (रा. कोयना वसाहत, पलूस) याच्याविरुद्ध ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत पूनम यांचे सासरे हणमंत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत चव्हाण हे पत्नी पूनम व मुलगा शौर्य यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमएच ५० एस २८०४) ताकारीहून कराडच्या दिशेने चालले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ताकारीजवळ कराडकडून आलेल्या मरागजे याच्या भरधाव मोटारीने (क्र. एमएच १० बीएम ५२४०) समोर चाललेल्या दुसऱ्या एका मोटारीला (क्र. एमएच ५० यू ६६७५) उजव्या बाजूने धडक दिली आणि त्यानंतर जयवंत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत दुचाकीवरील पूनम रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर जयवंत व शौर्य हे जखमी झाले. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक राहुल पाटील करत आहेत.