ताकारी उपसा सिंचन योजना 
सांगली

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजना दुष्काळी भागाला वरदान

जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर केली मात

पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल भोसले

देवराष्ट्रे : जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला नवसंजीवनी ठरलेली ताकारी उपसा सिंचन योजना कडेगाव, खानापूर, तासगाव, वाळवा, पलूस व मिरज या तालुक्यांतील शेती व शेतकरी यांची रक्तवाहिनी बनली आहे. योजना सुरू झाल्यापासून अनेकदा ताकारीच्या पाण्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करीत येथील शेतकर्‍यांच्या संकटांवर फुंकर घातली आहे.

ताकारी योजनेचा मुख्य कालवा182 कि.मी.लांबीचा आहे. याच कालव्याला असणार्‍या पोटपाटांची लांबी अंदाजे 400 कि.मी.पर्यंत आहे. यातून परिसरातील 27 हजार 400 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी कृष्णा कोयना लवादाने कोयना धरणामध्ये 9.34 टी.एम.सी. पाणी राखून ठेवले आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी ताकारी योजनेची संकल्पना 11 मार्च 1984 रोजी मांडली. काही दिवसांतच प्रशासकीय मंजुरी नसतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या उपस्थितीत देवराष्ट्रे येथे नारळ फोडून योजनेचा मुहूर्त करण्यात आला.

सुरवातीला ताकारी योजनेचा आराखडा केवळ 80 कोटी रुपयांचा करण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने यामध्ये बदल होत गेला. आता चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार योजनेला तब्बल 1322 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. कृष्णा नदीवरती साटपेवाडी येथे बंधारा बांधून टप्पा क्र.1 वरील साठवण हौदात पाणीसाठा केला जातो. येथे 1786 अश्वशक्तीचे 16 पंप बसवण्यात आले आहेत. तेथून 2.5 मीटर व्यासाच्या तीन पाईपलाईनमधून हे पाणी उचलण्यात येते व टप्पा क्र.2 मधील साठवण हौदात सोडण्यात येते. याठिकाणी पुन्हा 1786 अश्वशक्तीचे 16 विद्युत पंप बसवण्यात आले आहेत. या टप्प्यातून 2.5 मीटर व्यासाच्या तीन लाईनमधून हे पाणी योजनेच्या मुख्य कालव्यात सोडण्यात येते.

बंदिस्त नलिकेतून होणार पाणीपुरवठा

योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना समन्यायी पध्दतीने पाणी वितरित करण्यासाठी लाभक्षेत्र विकास योजनेतून तब्बल 270 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेतून थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग थांबून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT