भिलवडी : कोयना धरणात तब्बल ८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असतानाही कृष्णा व कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यास शासन व प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रसंगी स्वतः कोयना धरणावर जाऊन पाणी सोडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
भिलवडी (ता. पलूस) येथील कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीपात्रात उतरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत नदीपात्रातून उठणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
आंदोलनस्थळावरून बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळवून त्यांना हतबल करण्यासाठी आणि साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. कृष्णा खोरे हे पाण्याचे मुबलक साठे असलेले खोरे असतानाही केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे आणि वरिष्ठ स्तरावरील निर्णयाअभावी नदीकाठची गावे पाण्याविना होरपळत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, शासनाने अजूनही कालवा सल्लागार समितीची बैठक घेतलेली नसल्याने स्थानिक पातळीवर पाण्याचे नियोजन करण्याचे कोणतेही अधिकार उरलेले नाहीत, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पाण्याचे सर्व निर्णय थेट मंत्रालय स्तरावरूनच घेतले जात असल्याची माहिती पुढे आल्याने पाणीटंचाईबाबत राजकीय व प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या आंदोलनाला भिलवडी व परिसरातील गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला. सरकारने त्वरित नदीपात्रात पाणी न सोडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संदीप राजोबा, प्रतीक पाटील, सुरेंद्र वाळवेकर, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, शहाजी गुरव, बाळासाहेब मोहिते, बाळासोा शिंदे, ऐनुद्दीन ऊर्फ चया जमादार, मनोहर पाटील, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील, अमोल पाटील, अमोल चौगुले, सचिन किनीकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.