जत : सुसलाद (ता. जत) येथे रात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पंचय्या रामय्या मठपती यांच्या घराला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून, घरातील सोने-चांदीचे दागिने, कपडे व संसारोपयोगी साहित्य जळाल्याने सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महिलेच्या प्रसंगावधानाने कुटुंबातील सदस्य वेळीच घराबाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
सुसलाद येथील हनुमान मंदिरासमोर पंचय्या मठपती यांचे घर आहे. रात्री कुटुंबातील काही सदस्य अंगणात झोपले होते, तर एक महिला घरात झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास घरामध्ये गॅसचा वास येत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिने तत्काळ बाहेर धाव घेत इतरांना उठवले.
महिला घराबाहेर येताच काही क्षणांतच सिलेंडरचा जोरदार स्फोट होऊन घरातून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घराला वेढा दिला. या आगीत घरातील कपडे, मौल्यवान वस्तू, सोने-चांदी आणि सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.