सांगली : येथील भारत सूतगिरणीच्या परिसरात एकट्या राहणार्या वृद्धेला करणीची भीती दाखवण्यासाठी तिच्या घरासमोर उलट्या पंखाची कोंबडी गळा चिरून मारून टाकण्यात आली होती. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कोंबडीला त्या ठिकाणाहून हटविले आणि लोकांमध्ये असलेली करणीविषयीची भीती दूर केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली शाखेचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे वृद्ध महिलेला करणीची भीती दाखवण्यासाठी तिच्या घरासमोर उलट्या पंखांची गळा चिरलेली कोंबडी टाकण्यात आल्याची तक्रार आली. गेल्या चार-पाच वर्षांपासून अमावास्या, पौर्णिमेला तिच्या घरासमोर हळद, कुंकू, गुलालाने भरलेला उतारा टाकला जात होता. पण पहिल्यांदाच कोंबडी मारून टाकल्याची घटना समोर आली. त्यामुळे ती वृद्ध महिला भयभीत झाली. तिच्या मुलाचा करणी किंवा उतार्यावर विश्वास नसल्यामुळे त्याने ‘अंनिस’ला विनंती करून आईची भीती घालवण्यास सांगितले. ‘अंनिस’चे जगदीश काबरे, डॉ. सविता अक्कोळे, त्रिशला शहा आणि आशा धनाले हे कार्यकर्ते त्या वृद्धेला भेटण्यासाठी गेले होते.
तिच्या घरी गेल्यावर पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी आजुबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले आणि मग ती मेलेली कोंबडी अंगणात जिथे उतारा म्हणून टाकली होती तिथे निरीक्षण केले. डॉ. अक्कोळे, काबरे, धनाले यांनी लोकांचे प्रबोधन केले. तसेच एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्या कोंबडीला कार्यकर्त्यांनी भरले आणि आपल्याबरोबर घेऊन निघाले. ती पिशवी कचर्याच्या पेटीत टाकून ‘ऑपरेशन कोंबडी’ फत्ते केले.