कडेगाव : जानेवारी संपला तरी कडेगाव तालुक्यातील अनेक गावात आडसाली ऊस तसाच शेतात उभा आहे. ऊस कारखान्याकडे वेळेत गेला नाही तर बँका, सेवा सोसायटी व पतसंस्था यांची कर्जे मार्चपर्यंत कशी फेडायची, असा प्रश्न सध्या शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.
अजून काही दिवस तरी ऊस तोडणीसाठी लागणार असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस जशी वाढू लागेल तसे तोडणी मजुरांचा ऊस तोडणीचा दरही वाढू लागणार आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ऊस तोडणी मजुरांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे ऊस कारखान्यांकडे गाळपासाठी घालविण्यासाठी शेतकर्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे गट कार्यालयाबाहेर दररोज शेतकर्यांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे.
उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. सध्या तोडणीला आलेल्या बहुतांश क्षेत्रावरील उसाला चार महिन्यांपूर्वीच तुरे फुटले आहेत. त्यामुळे गाळपासाठी पाठविलेल्या ऊस वजनात मोठी तूट येत आहे. याचा शेतकर्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पुरता धास्तावला आहे. हुमणीमुळे उसाचे नुकसान झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी बहुतांश क्षेत्रावरील उसावर करप्या रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ऊस कारखान्यांकडे लवकर गाळपासाठी पाठविण्याची शेतकर्यांची धडपड सुरू आहे. परंतु यावर्षी ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी असल्याने शेतकर्यांची अवस्था मोठी बिकट झाली आहे. त्यामुळे तोडणी हंगाम ठरवणे कारखाना कर्मचार्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. गट कार्यालयात दररोज कारखाना कर्मचारी व शेतकरी यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत.