रजाअली पिरजादे
कडेगाव शहर : भाजीपाला लागवडीला येणारा अमाप खर्च आणि दरातील अनिश्चितता... आले पिकाच्या अल्पदरामुळे कर्जबाजारीपणा... अशा परिस्थितीत शाश्वत ऊस पिकाच्या शेतीने शेतकऱ्यांना चांगलेच सावरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ऊसशेतीच फायद्याची ठरत असल्याची चर्चा शेतकरी वर्गात होऊ लागली आहे.
तालुक्यात टेंभू, ताकारी या सिंचन योजनांमुळे तसेच ऊस शेतीतील आमूलाग्र बदल आणि शाश्वतपणामुळे शेतकरी सक्षम बनतो आहेच, पण तालुक्याचे अर्थकारण ऊसशेतीमुळे बदलत आहे. तालुक्याचे एकूण 58 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 20 ते 25 हेक्टर क्षेत्र ऊस पिकाचे आहे. पूर्वी एकरी चाळीस टन म्हणजे सर्वाधिक उत्पादन मानले जात होते. आता मात्र तालुक्यात एकरी 80 ते 120 टन हून अधिक उत्पादन म्हणजे नियमित झाले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा
ऊस पिकासाठी केंद्र शासनाने रास्त आणि किफायतशीर भाव (एफ.आर.पी.) घोषित केला आहे. मागील चार-पाच वर्षांपासून येथील ऊस उत्पादक शेतकरी ऊस शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहे.
15 हजार हेक्टरवर ठिबक सिंचन
जमीन वाफसा पद्धतीत राहण्यासाठी ठिबक सिंचन संचाचा वापर शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. सध्या तालुक्यात एकूण 15 हजार हेक्टरवर ठिबक सिंचन संचाचा वापर केला जात आहे. जवळपास 50 टक्के ऊसपिके ठिबक सिंचनावर घेतली जात आहेत. ऊस उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात चांगली वाढ होणार आहे.
सेंद्रिय कर्ब वाढीकडे लक्ष
शेतकरी आता शेणखत, गांडूळ खत यासोबत ऊस पालापाचोळा जमिनीत अधिक प्रमाणात पुरून कर्ब वाढीकडे लक्ष देताना दिसत आहेत.
ऊस वाढीसाठी एआयचा वापर
ऊस पिकाचे उत्पादन वाढावे यासाठी आता तालुक्यात एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. यासाठी सोनहिरा साखर कारखाना विशेष प्रयत्न करताना दिसत आहे.