Sugarcane Price 
सांगली

Sangli Sugarcane Price : ‘राजारामबापू’, ‘विश्वास’, ‘कृष्णा’, ‘दालमिया’ची ३९०० रुपये उचल

अखेर ऊस दराची कोंडी फुटणार?; अन्य कारखान्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : जिल्ह्यातील ऊस दराबाबत सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. राजारामबापू साखर कारखान्याची साखराळे, वाटेगाव आणि कारंदवाडी ही तीन युनिट, शिराळा-चिखली येथील विश्वास कारखाना आणि कोकरूड येथील दालमिया शुगर, यशवंतराव मोहिते कृष्णा या सहा कारखान्यांनी प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. नागेवाडी येथील भारती शुगरने यापूर्वीच ३८०० रुपये आणि अधिक दर देण्याचे जाहीर केले होते. यानंतर आता अन्य कारखान्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, ऊस दराची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​जिल्ह्यात साखर हंगाम जोरात सुरू होऊनही कारखान्यांनी दर जाहीर न केल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. गाळप झालेल्या उसाचे पहिले बिल १४ दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक असतानाही बिले निघाली नव्हती. त्यामुळे सहकार आयुक्तांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पाच कारखान्यांनी ३९०० रुपयांचा दर जाहीर केल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित दहा सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या कारखान्यांकडून किती दर जाहीर होतो, याकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पूर्व भागातील साखर कारखान्यांचा साखर उतारा तुलनेने कमी राहत असल्याने तेथील कारखाने किती दर देणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

​दुसरीकडे, जाहीर झालेला ३९०० रुपयांचा दर ‘कोल्हापूर पॅटर्न’प्रमाणे नसल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे संघटनेच्या आंदोलनानंतर शेतकर्‍यांच्या पदरात आणखी किती वाढीव रक्कम पडणार, याबाबतची उत्सुकता अद्याप कायम आहे.

कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दर हवाच...

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दर जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. काही कारखान्यांनी आज जाहीर केलेला दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार नाहीत. हाच दर अंतिम होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दर मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT