सांगली : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी पुढे गेल्याने जिल्ह्यातील 8 ठिकाणी स्ट्रॉगरूमबाहेर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी 256 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईश्वरपूर आणि तासगावमध्ये स्ट्राँगरूमबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात आहे. आष्ट्यातील गदारोळानंतर आता स्ट्राँगरूमची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या नगरपरिषदा आणि आटपाडी आणि शिराळा या नगरपंचायतीसाठी मंगळवारी चुरशीने मतदार पार पडले. या सर्व ठिकाणी मिळून 75.96 टक्के मतदान झाले आहे. यावेळी तासगाव, पलूस, जत आणि ईश्वरपूरमध्ये वातावरण ताणवपूर्ण बनले होते. ईश्वरपूर आणि तासगावमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले होते.
त्यात आष्टा येथे बुधवारी सकाळी प्रशासनाने दिलेल्या मतदानाच्या आकडेवारीत दोन हजार मतांचा फरक असल्याच्या आरोपामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. त्यामुळे सांगली पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. जिल्ह्यात 8 ठिकाणी असणाऱ्या स्ट्राँगरूमबाहेर सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे 32 अधिकारी, 80 राज्य राखीव दल, स्थानिक पोलिस ठाण्याकडील 64 कर्मचारी, सहायक निरीक्षक, 80 होमगार्ड, असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ईश्वरपूर, तासगाव आणि जत या नगरपरिषदांच्या निवडणुकांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या तीनही नगरपालिका क्षेत्रांमध्ये मतदानावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तासगावमध्ये आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांचा गट आमने-सामने आला होता, तर ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी संघर्ष पहावयास मिळाला. या सर्व वातावरणात मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी सांगली जिल्हा पोलिसांनी जोरदार यंत्रणा राबविली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हत्यारबंद पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षकांकडून स्ट्राँगरूमची पाहणी
तासगाव नगरपरिषदेसाठी चुरशीची निवडणूक झाल्याने तसेच या ठिकाणी दोन गट आमने-सामने असल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे रात्री उशिरापर्यंत तासगाव येथील स्ट्राँगरूममध्ये तळ ठोकून होते. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर याही स्ट्राँगरूमच्या बंदोबस्ताचा सातत्याने आढावा घेत आहेत.