सांगली : मारुती रोडवरील हातगाडे व भाजीविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात गुरुवारी विक्रेत्यांनी हातगाड्यांसह महापालिकेवर धडक मोर्चा काढला. दरम्यान, मारुती रोडसह मुख्य बाजारपेठेतील पथविक्रेत्यांवरील कारवाई सोमवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. सोमवारी आयुक्त संजीता महापात्र व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे हे मुख्य बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेतील. भाजप नेते पृथ्वीराज पवार व नगरसेवक अभिजित कोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय झाला.
गेल्या दोन दिवसांपासून आयुक्त महापात्र यांच्या सूचनेनुसार महापालिकेने मुख्य बाजारपेठेतील भाजी व फळविक्रेत्यांसह हातगाडीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईला विरोध करत विक्रेत्यांनी बुधवारी सायंकाळी अतिक्रमण विभागाची गाडी अडवून धरली आणि महापालिका मुख्यालयात ठिय्या मांडला. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असल्याने प्रशासनाने कारवाई करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, बुधवारी यावर तोडगा निघू शकला नव्हता.
गुरुवारी दुपारी पृथ्वीराज पवार आणि नगरसेवक अभिजित कोळी यांच्या नेतृत्वाखाली पथविक्रेते पुन्हा हातगाड्यांसह महापालिकेत दाखल झाले. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान महापालिका प्रशासनाकडून पुढील तीन दिवस मुख्य बाजारपेठेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल आणि सोमवारी आयुक्त स्वतः पाहणी करून निर्णय घेतील, असे आश्वासन रोकडे यांनी दिले. या आश्वासनानंतर विक्रेत्यांनी आंदोलन मागे घेतले.