सांगली : भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले आणि त्यांचा वाढता उपद्रव यावरून मंगळवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शहरातील नागरिकांवर वारंवार होणारे कुत्र्यांचे हल्ले रोखण्यासाठी आक्रमक व उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पदाधिकारी व नागरिकांनी केली. दरम्यान, भटक्या कुत्र्यांवर कारवाई करताना शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचे (एसओपी) पालन करावे, अशी मागणी प्राणीमित्रांनी केली. प्रशासन व प्राणीमित्र यांनी समन्वयाने भटक्या कुत्र्यांची समस्या हाताळणे आवश्यक असल्याचे मत आयुक्त संजीता महापात्र यांनी व्यक्त केले.
महापालिकेचे 'डॉग युनिट' सक्षम करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ‘भटक्या कुत्र्यांना जिथे वर्दळ नाही, तसेच शाळा नाहीत, अशा ठिकाणी खाऊ घालता येईल. कुत्र्यांना खाऊ घालण्याची ठिकाणे निश्चित करू. त्यानंतर इतरत्र कोणीही खाऊ घालताना प्राणीमित्र आढळले, तर त्यांच्यावर १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल’, असा इशारा आयुक्तांनी दिला.
महापालिका सभागृहात आयुक्त संजीता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, समाजकल्याण सभापती गीता पवार, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित कोळी, प्रभाग समितीचे सभापती रमेश सर्जे, वैशाली गवळी, शिरिन पिरजादे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुचेता पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोस्वामी, पशुवैद्यकीय विभागप्रमुख तथा वरिष्ठ स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, तसेच प्राणीमित्र अजित काशीद, किरण नाईक, अशोक लकडे, कौस्तुभ पोळ, मुस्तफा मुजावर, मृणाल जाधव, श्रीमती पटवर्धन, पूजा सव्वाशे, डॉ. अनिरुद्ध पाटील व नागरिक उपस्थित होते. कुत्री पकडणे, त्यांचे लसीकरण व नसबंदी या प्रक्रिया एसओपीनुसारच होणे आवश्यक आहे. कुत्री कोणत्या परिस्थितीत आक्रमक होतात, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी कौस्तुभ पोळ यांनी केली.
विरोधी पक्षनेत्यांचे कायद्यावर बोट
विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात तब्बल ४ हजार ७४७ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी मांडली. नागरिकांवर वारंवार हल्ले होत असतील, तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल त्यांनी केला. पाच वर्षांच्या बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. प्राण्यांच्या झुंजींना प्राणीमित्रांचा विरोध असतो; मात्र कोंबड्या व बकऱ्यांची कत्तल केली जाते, त्याबाबतही प्राणीमित्रांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे चव्हाण म्हणाले.
बैठकीचे वातावरण तापले
काही प्राणीमित्रांनी 'लहान मुले कुत्र्यांना दगड मारत असल्याने कुत्री चावतात' असा मुद्दा मांडला. त्यावर ‘मागून येऊन हल्ला करणाऱ्या कुत्र्यांचे काय? रस्त्यावरून जाणाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांचे काय? त्याला जबाबदार कोण?’ असा प्रतिप्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे बैठकीत काही काळ वातावरण तापले.
शाळांच्या परिसरात झुंडी
नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याचे स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी सांगितले. बिरनाळे स्कूल व अन्य काही शाळांच्या परिसरात कुत्र्यांच्या झुंडी फिरत असून, शालेय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तेव्हा प्राणीमित्र कुठे असतात?
राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनीही प्राणीमित्रांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आजारी कुत्र्यांना औषधोपचारासाठी प्राणीमित्र पुढे येतात का?, असा सवाल त्यांनी केला. केवळ कुत्री पकडू नयेत म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यापेक्षा उपद्रवी कुत्र्यांच्या प्रश्नावरही ठोस भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले. आपल्या प्रभागातील बीफ मार्केट, मटण मार्केट आणि चिकन विक्रीच्या दुकानांची संख्या मोठी आहे. ही दुकाने बंद असलेल्या दिवशी नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होते, इतक्या मोठ्या प्रमाणावर कुत्री आक्रमक होतात, असे बागवान यांनी सांगितले.
श्वान समितीची पुनर्रचना करा
अभिजित कोळी यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई थांबवू नये, अशी मागणी केली. सांगलीवाडी परिसरात लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या असून, नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कुत्र्यांची नसबंदी 'ॲनिमल बर्थ कंट्रोल'च्या निकषांनुसार होत नसल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला. श्वान समिती सक्रिय नसल्याने तिची पुनर्रचना करण्याची मागणी सुनीता पाटील यांनी केली. पूजा सव्वाशे यांनीही श्वान समिती नव्याने स्थापन करण्याची मागणी केली. नसबंदीच्या शस्त्रक्रियांची संख्या वाढवण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रणा वाढवावी, अशी मागणी गोरखनाथ पाटील यांनी केली. कुत्र्यांच्या प्रजननासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, याची तपासणी करावी, अशी सूचना डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी केली.