कासेगाव : पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी वाळवा पश्चिम विभागातील वाटेगाव, भाटवडे, काळमवाडी, शेणे, सुरूल तसेच शिराळा उत्तर विभागातील बांबवडे, करमाळे, पाचुंब्री, टाकवे परिसरात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, विजांचा कडकडाट आणि प्रचंड वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा देतानाच मोठा आर्थिक फटकाही दिला. अनेक ठिकाणी ऊस आणि भात पिके भुईसपाट झाली. बांबवडे येथील शेतकरी संदीप नेमिनाथ पाटील यांच्या ऊस पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे ऊस पीक आडवे झाल्याने ऊसतोडणीच्या कामातही अडथळे निर्माण होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट झाली होती. सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले. सायंकाळी सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसाने बांबवडे परिसराला झोडपून काढले. प्रचंड वाऱ्यामुळे शेतातील उभा ऊस आडवा झाला, तर भात पिकांचेही नुकसान झाले.
काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने कासेगाव-बांबवडे राज्य मार्गावरील वाहतुकीला एक ते दोन तास अडथळा निर्माण झाला. यंदा मान्सूनच्या लहरीपणाचा मोठा फटका वाळवा पश्चिम आणि शिराळा उत्तर विभागातील शेतकऱ्यांना बसला आहे.