सांगली; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांना खत खरेदी करताना जात सांगावी लागत आहे, हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही. आम्ही जात नाही तर प्रवर्ग विचारतोय, अशी शब्दांची फिरावाफिरवी राज्याचे कृषी विभाग करत आहे. मात्र, प्रवर्ग आणि जात यामध्ये फरक काय आहे? शाब्दिक खेळ थांबवा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, प्रसंगी राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
खराडे म्हणाले, रासायनिक खत घेताना पॉस मशिनमध्ये जात विचारणा केल्याच्या प्रकारावरून शुक्रवारी विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीबीटी पोर्टलवरून जात हा रकाना वगळण्याची विनंती केंद्राकडे करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर राज्यशासनाचे कृषी विभाग म्हणत आहे की, कोणत्याही शेतकर्याला जात विचारली जात नाही. प्रत्येक वर्गवारीला लाभ मिळतो की नाही, हे पाहण्यासाठी प्रवर्गाची विचारणा केली जात असल्याची खुलासा केला. मात्र, प्रवर्ग आणि जात यातील फ रक काय, याचा खुलासा विभागाने करावा. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जेव्हा दुकानदार शेतकर्यांना सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याची विचारणा करतो, तेव्हा सर्वसामान्य शेतकर्यांना याचे काहीच उत्तर देताच नाही. त्यामुळे शेवटी शुद्ध भाषेत तुमची जात कोणती हे शेतकर्याला विचारावेच लागते. तसेच कोणत्याही दुकानात आतापर्यंत जात किंवा प्रवर्ग बघून खत दिले जातच नाही. त्यामुळे प्रत्येक वर्गवारीला लाभ मिळतो याची तपासणी होत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे योग्य आहे. अधिकार्यांनी केलेला शब्दछल तातडीने थांबवावा.
ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हिंदू -मुस्लिमामध्ये तेढ निर्माण करुन सत्तेवर आले. आता पुन्हा शेतकर्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचे नवे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र, हा उद्योग तातडीने बंद करा. तसेच कृषी विभागाकडून सुरू असणारी शब्दाची फिरवाफिरवी थांबवावी; अन्यथा रस्त्यावरून उतरून राज्यभर आंदोलन करू, त्यांची सुुरुवात सांगलीतून करू, असा इशाराही खराडे यांनी दिला आहे.
खराडे म्हणाले, खत खरेदी करताना शेतीचे क्षेत्र किती, कोणते पीक घेत आहे, हंगाम कोणता, एकरी किती उत्पादन काढता, अशी माहिती विचारली तर ती मान्य करू. या माहितीचा शेतीचे धोरण ठरविताना उपयोग होईल. मात्र, शेतकर्यांचा हिताचा विषय बाजूला ठेवून त्यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्योग सुरू केला आहे. मात्र, तो तातडीने थांबवावा.