वळसंग ः जत तालुक्यातील अमृतवाडी फाटा परिसरात बुधवार, दि. 28 रोजी दुपारी बसचा टायर अचानक फुटल्याने मोठा अपघात टळला. टायर फुटून रस्त्याखाली गेलेली बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे कलंडली नाही आणि सुमारे 50 प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जत आगाराची बस (एमएच 14 बीटी 2902) अंकलगीहून वळसंग-अमृतवाडी मार्गे जतच्या दिशेने निघाली होती. अमृतवाडी फाटा परिसरात बस आली असता, बसचा पुढील टायर अचानक मोठा आवाज होऊन फुटला. टायर फुटताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला घसरत गेली. वेग आणि टायर फुटल्याने बसवरील चालकाचा ताबा सुटला. मात्र, चालकाने संयमाने आणि कौशल्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. बस रस्त्याखाली उतरली, पण ती चालकाच्या प्रयत्नामुळे उलटली नाही. त्यामुळे बसमधील 50 प्रवासी सुखरूप बचावले.