आरवडे (ता. तासगाव) : येथील बस स्थानकावर एसटीच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी व पालक. 
सांगली

Sangli News : आरवडेत एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) गावातील विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत आगार प्रमुखांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे नाराज विद्यार्थी व पालकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

गावातून सकाळी तासगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सर्वांनी एसटी पास काढले आहेत. मात्र मागील एक ते दीड महिन्यापासून या विद्यार्थ्यांना एसटी बस थांबत नसल्यामुळे शाळा, कॉलेजला जाणे शक्य होत नाही. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटीचा पास असून सुद्धा गाड्या थांबत नसल्यामुळे खासगी वाहनाने तिकिटाचे पैसे देऊन किंवा हात दाखवून शिक्षणासाठी जावे लागत आहे. अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

याबाबत अनेकदा आगार प्रमुखांच्याकडे तक्रार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुढील चार दिवसात यावर योग्य उपाययोजना केली नाही तर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ त्यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अरविंद शिंत्रे, सचिन चव्हाण, प्रमोद वाघ, अशोक चव्हाण, भानुदास कदम, सुहास चव्हाण, हणमंत पाटील उपस्थित होते.

जवळपास ३ तास वाट पाहून सुद्धा बस थांबली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माजी उपसरपंच अरविंद शिंत्रे मदतीला धावले. त्यांनी आपल्या टेंपोमधून विद्यार्थ्यांसह थेट तासगाव आगार गाठले. दरम्यान, गावातील विद्यार्थ्यांना तासगाव येथे ये जा करण्यासाठी शालेय वेळेत स्वतंत्र एसटी बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश चव्हाण, अरविंद शिंत्रे, सचिन चव्हाण, सुहास चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT