सांगली

सांगली : टोल नाक्यातील शेडवर एसटी आदळली; 25 प्रवाशी जखमी

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील सांगलीवाडीत बंद अवस्थेतील टोल नाक्यातील शेडमध्ये भरधाव बस जाऊन आदळल्याने 25 प्रवाशी जखमी झाले. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

नाईकबा ते सांगली ही बस (एम.एच.40, एन. 9503) ने सोमवारी दुपारी सांगलीकडे येत होती. चालक तुकाराम बाबासाहेब कुलकर्णी (वय 43, रा. भडकंबे, ता. वाळवा) या बसवर चालक होते. सांगलीवाडीच्या बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ बस आली. यावेळी बसच्या पुढे बैलगाडी असल्याने चालकाने अचानक रस्त्याचा मार्ग बदलला. त्याचवेळी जोराचा ब्रेक मारला. तसेच रस्त्यावर चिखल असल्याने बस थेट टोल नाक्यातील पत्र्यातील शेडवर जावून आदळली. बसमधील चालक व महिला वाहकासह प्रवासी जखमी झाले. यातील महिला वाहक बी. बी. खोत गंभीर जखमी झाल्या. बसमधून 50 प्रवाशी प्रवास करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्सणालयात धाव घेतली. एस. टी. महामंडळाचे अधिकारीही रुग्णालयात आले. जखमी सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

SCROLL FOR NEXT