सांगली ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिलाच मराठीचा पेपर कॉपीमुक्त झाला. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मोबाईल कॅमेऱ्याद्वारे परीक्षार्थींवर लक्ष ठेवण्यात आले.
जिल्ह्यातील 39 हजार 628 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. परीक्षेसाठी 105 केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी, पालकांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थी, पालकांची गर्दी होती. अनेक पालक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत होते. केंद्राच्या आत जाण्यापूर्वी काही विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन उजळणी करीत होते. केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. पेपरचे शांततेत वाचन करावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.