Suspension File Photo
सांगली

Ranjana Umbrahande Suspension: विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजना उंबरहंडे निलंबित

पुण्यातील कलम १५५ गैरप्रकार प्रकरण; त्यांच्या जागी लीना खरात यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

सांगली : विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजना उंबरहंडे यांंना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी बुधवारी निलंबित केले. या बाबत महसूल विभागाचे आदेश प्रशासनाला मिळाले, त्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या जागी तहसीलदार लीना खरात यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात कलम १५५ मध्ये केलेल्या गैरप्रकारप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशनात ही घोषणा केली होती. उंबरहंडे या सांगलीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून गेल्या दीड वर्षापासून कार्यरत होत्या. त्यांच्या ठिकाणी तहसीलदार लीना खरात यांची नियुक्ती करण्यात आली. खरात यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची याठिकाणी बदली करण्यात आली.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५ च्या कथित गैरवापरप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे विभागात एका उपजिल्हाधिकाऱ्यासह १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा अधिवेशनात केली होती. या प्रकरणात काही तहसीलदार, नायब तहसीलदार आणि स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कलम १५५ चा वापर केवळ शुद्धलेखन वा लेखीय चुका सुधारण्यासाठी असतो, मात्र मालकी हक्क बेकायदेशीरपणे बदलण्यासाठी याचा गैरवापर केल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यावर होता. या प्रकरणी उंबरहंडे यांचीही चौकशी सुरू होती. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाने ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT