गुन्हे दाखल करून डीजे, लेसर यंत्रणा जप्त करणार  
सांगली

Sangli News| गुन्हे दाखल करून डीजे, लेसर यंत्रणा जप्त करणार

पोलिस अधीक्षक तुषार दोशी; 'एक कर्मचारी, एक मंडळ' योजना लागू

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : आगामी गणेशोत्सव, नवरात्र आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या काळात ध्वनी व पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि ध्वनी व्यवस्था ( साऊंड सिस्टिम) पुरवणाऱ्या मालकांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. तसेच घटनास्थळावरूनच डीजे आणि लेसर यंत्रणा जप्त करण्यात येईल, असा सज्जड इशारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.

उत्सव काळात डीजेचा प्रचंड दणदणाट आणि डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवणाऱ्या हाय-बीम लेसर लाईट्सचा वापर प्रचंड वाढला आहे. या अति-उंच आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. तसेच तीव्र लेसर बीममुळे नागरिकांची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक तुषार दोशी दैनिक पुढारीशी बोलत होते.

ते म्हणाले, वाढत्या प्रदूषणाबाबतची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेतली आहे. नुकत्याच झालेल्या शिराळा येथील नागपंचमी उत्सवामध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या अनेक मंडळांवर सांगली पोलिसांनी कठोर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. तोच परिपाठ आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात अधिक कडकपणे राबवला जाणार आहे.

ते म्हणाले, ​उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी प्रशासनाने 'एक कर्मचारी, एक मंडळ' ही विशेष दत्तक योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत एका पोलिस कर्मचाऱ्याकडे एका गणेश मंडळाची थेट जबाबदारी सोपवली जाईल. श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेपासून ते विसर्जनापर्यंतची संपूर्ण देखरेख हा कर्मचारी करेल. जर संबंधित मंडळाकडून नियमांचा भंग झाला, तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच संबंधित कर्मचाऱ्याचीही जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

ते म्हणाले, ​केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता प्रबोधनावर भर देत पोलिसांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. शाडूच्या मातीचा वापर, पर्यावरणपूरक कृत्रिम तलावात विसर्जन, एकुलत्या एक प्लास्टिकवर बंदी, धार्मिक सलोखा आणि उत्कृष्ट समाजप्रबोधनपर देखावे सादर करणाऱ्या मंडळांना पोलिस प्रशासनाकडून विशेष बक्षीस देऊन सन्मानितकेले जाईल. उत्सवाचा आनंद हा दुसऱ्याच्या आरोग्यासाठी किंवा जिवासाठी धोकादायक ठरता कामा नये. सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी कायदेशीर नियमांचे पालन करत शांतताप्रिय व प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ध्वनी प्रदूषणाबाबत मंडळांना सूचना दिल्या जाणार - संजीता महापात्र, आयुक्त

डीजे तसेच लेसरच्या वापराबाबत कायद्याचे काटेकोर पालन केले जाणार आहे. ध्वनिप्रदूषण, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था यांचा विचार करून उत्सव मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे, असे आयुक्त संजीता महापात्र यांनी स्पष्ट केले. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था, मिरवणुकांचे नियोजन, ध्वनिक्षेपकाच्या वापराची वेळ, डीजे तसेच लेसर यंत्रणेच्या वापराबाबत मंडळांना स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. त्यामुळे सर्व मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यावरणपूरक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त संजीता महापात्र यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT