सांगली : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.
मंगळवार बाजार येथील महापालिकेचे दुकान गाळे, औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या इमारती, माधवनगर परिसरातील रविवार पेठेतील चांदणी चौक, तसेच लक्ष्मी चित्रमंदिरचे खुले मैदान, या डार्क स्पॉटची त्यांनी पाहणी केली. चिंतामणीनगर परिसरात अलीकडेच बाकड्यांची तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोशी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. चांदणी चौक, रविवार पेठ येथील युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
कुपवाडमध्येही पाहणी
कुपवाड : नूतन पोलिस अधीक्षक दोशी यांनी शुक्रवारी रात्री कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागांत पोलिस फौजफाट्यासह संचलन केले. आंबा चौक, अहिल्यानगर, प्रकाशनगर, कापसे प्लॉट यांसारख्या डार्क स्पॉट आणि संवेदनशील भागाची त्यांनी स्वतः पाहणी केली. संचलनामध्ये त्यांच्यासोबत पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता.