सांगली पुढारी वृत्तसेवा : 'समुद्रा'ने सांगली व मिरजेत सार्वजनिक रस्त्यांवर बसवलेले काही स्मार्ट एलईडी दिवे तीन दिवसांपासून बंद आहेत. बंद पडलेले दिवे 48 तासात दुरुस्त करण्याचे करारात नमूद असतानाही ते दुरुस्त केले नसल्याने कराराचा भंग होत आहे, असे नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी सांगितले.
साखळकर म्हणाले, महापालिका क्षेत्रातील स्मार्ट एलईडी प्रकल्प 'समुद्रा'कडून राबविला जात आहे. प्रमुख रस्त्यांवरील पोलवर स्मार्ट एलईडी दिवे बसवले जात आहेत. स्टेशन चौकात डीवायएसपी कार्यालयाच्या अलिकडे तसेच विठ्ठल मंदिरासमोरील पोलवर बसवलेला स्मार्ट एलईडी दिवा बंद पडला आहे. मिरजेतही बसवलेले काही दिवे बंद आहेत. त्याकडे आयुक्तांनी गांभिर्याने लक्ष द्यावे.
साखळकर म्हणाले, बोगस पाणी कनेक्शनचे सर्वेक्षण प्रभावीपणे झाले नसल्याचा संशय आहे. बोगस पाणी कनेक्शनचे सर्वेक्षण त्रयस्थ यंत्रणेमार्फत करावे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या लोखंडी पायर्या गंजल्या आहेत. दि. 14 एप्रिल 2022 रोजी जयंतीपूर्वी लोखंडी पायर्या दुरुस्त कराव्यात. पुतळा परिसराची रंगरंगोटी करावी, अशी मागणी साखळकरांनी केली आहे.