Sangli Municipal Corporation Pudhari Photo
सांगली

Sangli Politics : महापौरांची प्रतिष्ठापना आधी; सभागृह नेता, विरोधी पक्षनेता नंतर

भाजपचा गटनेता हा सभागृहाचा नेता; काँग्रेसकडे जाणार विरोधी पक्षनेतेपद

पुढारी वृत्तसेवा

सांगली :महापालिकेतील सर्वात मोठ्या पक्षाचा गटनेता, ज्याला महापौरांकडून तशी मान्यता मिळाली असेल, तो सभागृह नेता असेल आणि मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा गटनेता, ज्याला महापौरांकडून तशी मान्यता मिळाली असेल, तो विरोधी पक्ष नेता असेल. महापौर, उपमहापौर निवडीनंतर सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता यांच्या नावांची महापौरांकडून अधिकृत घोषणा होईल. त्यामुळे आधी महापौरांची प्रतिष्ठापना आणि नंतर सभागृह नेता, विरोधी पक्षनेता यांची अधिकृत घोषणा होईल. दरम्यान, सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता यांना स्वतंत्र केबिन, कर्मचारी आणि वाहन सुविधा असेल. अन्य गटनेत्यांच्या अशा सुविधांबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महापालिकेत 39 जागा मिळवलेला भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 आणि शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या गटनेतेपदी संदीप आवटी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी युवराज गायकवाड, शिवसेनेच्या गटनेतेपदी युवराज बावडेकर यांची निवड झालेली आहे. काँग्रेसच्या गटनेतेपदाची निवड रखडली आहे. काँग्रेसच्या गटनेतेपदासाठी फिरोज पठाण व मंगेश चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसचे गटनेते हे महापालिकेतील विरोधी पक्षनेते बनतील.

महापौर, उपमहापौर निवडणूक दि. 10 फेब्रुवारीरोजी आहे. या निवडीनंतर सभागृह नेता व विरोधी पक्षनेता यांच्या नावाची अधिकृत घोषणा महापौर यांच्याकडून होईल. सभागृह नेता, विरोधी पक्षनेता यांची अधिकृत घोषणा महापौरांकडून केली जाते. त्यामुळे प्रथम महापौर, उपमहापौर निवड होणार आणि नंतर सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार, हे स्पष्ट आहे.

गटनेत्यांना केबिन, वाहनाचा विषय ऐरणीवर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सोमवारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तराहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील यांना निवेदन दिले. गटनेते म्हणून महापालिकेत स्वतंत्र केबिन, कर्मचारी व वाहन मिळावे, अशी मागणी केली. दरम्यान, गेल्यावेळचे (2018 ते 23) राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांना स्वतंत्र केबिन, वाहन दिले होते. तो खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी तक्रार मध्यंतरी झाली होती. तत्कालीन उपायुक्तांनी बागवान यांच्याकडून खुलासा मागवला होता. दरम्यान, महापालिका निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळीही वाहन वापरावरून बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली होती. ती हरकत फेटाळली असली तरी आता पुन्हा नव्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटनेत्यांना स्वतंत्र केबिन, कर्मचारी, वाहन मिळणार का, हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सध्यातरी प्रशासनाकडून रेड सिग्नल दाखवला आहे. मात्र महापौर, आयुक्त यांच्याकडून अधिनियमातील तरतुदी आणि हक्क, अधिकार पाहून निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT