सांगली : अपुरा व दूषित पाणीपुरवठा तसेच सांगली, मिरज ड्रेनेज योजनेचे रखडलेले काम यावरून महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण तसेच काँग्रेस नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शासनस्तरावर पाठपुरावा करून वारणा उद्भव पाणी योजना मार्गी लावा, केवळ कागदी घोडे नाचवू नका, पाठपुरावा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पाणीपुरवठा व ड्रेनेज योजना या विषयावर शुक्रवारी स्थायी समिती सभेत बैठक घेतली. नगरसेवक राजेश नाईक, मयूर पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश सर्जे, सोनल पाटील, स्मिता यमगर, अश्विनी कदम, ॲड. बिलकिस बुजरूक, सलमा शिकलगार, वर्षा निंबाळकर, अश्विनी कोळेकर तसेच कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, पाणी पुरवठा विभागाचे विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील, शाखा अभियंते तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील संजयनगर, शामरावनगरसह काही भागात अपुरा तसेच दूषित पाणीपुरवठा होतो. नदी उशाला असताना अपुरा पाणीपुरवठा होत असल्यावरून विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. नळ जोडण्यांना 10 कोटीची पाणी मीटर बसवण्यापेक्षा प्रथम पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करा, अशा सूचना केल्या. जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकणे, तसेच आवश्यक ठिकाणी नवीन टाक्या, माळबंगला येथे आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात आली.
मिरज पंपिंग स्टेशनचे काम प्रलंबित असल्याने गेली पाच वर्षे मिरज वखारभागचा रस्ता बंद असल्याकडे नगरसेविका ॲड. बिलकिस बुजरूक यांनी लक्ष वेधले. हिराबाग वॉटर वर्क्स येथे ओपन जीम, ट्रॅकची मागणी मयूर पाटील, सलमा शिकलगार यांनी केली. संजयनगर परिसराच्या ड्रेनेजचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील, रमेश सर्जे, अश्विनी कोळेकर यांनी केली. सांगलीवाडीच्या सांडपाण्याचा प्रश्न तसेच पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी अश्विनी कदम यांनी कली. दरम्यान, सांगली, मिरज ड्रेनेज योजनेचे रखडलेले काम गतीने पूर्ण करावे, कुपवाड ड्रेनेज योजनाही मुदतीत कार्यान्वित करावी, असे निर्देश मंगेश चव्हाण यांनी दिले. दरम्यान, विरोधी पक्षनेते चव्हाण यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी नागरी प्रश्नांबाबत आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली.
मिरासाहेब दर्गा, प्रार्थनास्थळांना सुविधा द्या
नगरसेविका ॲड. बिलकिस बुजरूक म्हणाल्या, पवित्र रमजान महिना सुरु आहे. दि. 21 मार्च रोजी रमजान ईद आहे. मिरजेत मोठ्या संख्येने मुस्लिम समुदाय राहतो. याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द मिरासाहेब दर्गा आहे. रमजान महिन्यात दर्गा व परिसरामध्ये गर्दी असते. दर्गा परिसर व प्रार्थनास्थळी तातडीने स्वच्छता करावी. सुव्यवस्था व दैनंदिन सुविधांबाबत संबंधित कार्यालय व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना कराव्यात. दर्गा परिसर तसेच प्रार्थनास्थळांमध्ये दररोज स्वच्छता, औषध फवारणी, रस्ते दुरुस्ती, बंद स्थितीतील दिवाबत्ती दुरुस्त करुन चालू करणे, दर्गा व मशीद परिसरातील कचरा दिवसातून दोनवेळा उचलणे, घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणे, नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करून पाण्याची वेळ एक तासाने वाढवून देणे गरजचे आहे. त्याबाबत आयुक्त सत्यम गांधी यांना निवेदन दिले आहे.