सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News| स्वीकृतच्या सहा जागांसाठी सहाच अर्ज

विद्या मोटे, धनश्री लाड, विठ्ठल साळुंखे, हर्षवर्धन देशमुख, संतोष घनवट, सतीश पवार यांची निवड निश्चित

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या सहा स्वीकृत सदस्यपदांसाठी सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विद्या मोटे (शिवसेना, विभूतवाडी), विठ्ठल साळुंखे (काँग्रेस, पारे), हर्षवर्धन देशमुख (राष्ट्रवादी अजित पवार गट, आटपाडी), धनश्री लाड (भाजप, कुंडल), संतोष घनवट (बागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) आणि सतीश पवार (मणेराजुरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांनी प्रशासनाकडे अर्ज सादर केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने या सहा जणांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत प्रथमच स्वीकृत सदस्यांची निवड केली जात आहे. मिनी मंत्रालयात काम करण्याची संधी मिळावी, यासाठी अनेक इच्छुक प्रयत्नशील होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळातही नेत्यांकडून अनेकांना संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत संधी न मिळालेल्या तसेच पराभूत झालेल्या इच्छुकांना स्वीकृत सदस्य पदाच्या माध्यमातून पुन्हा संधी मिळाली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर तब्बल नऊ महिन्यांनी ही प्रक्रिया होत आहे. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के, तर पंचायत समितीच्या सदस्य संख्येच्या २० टक्के सदस्यांची स्वीकृत म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत ६१ निवडून आलेले सदस्य असल्याने सहा स्वीकृत सदस्यांची भर पडून सभागृहाची एकूण सदस्य संख्या ६७ होईल.

जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेले अर्ज जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे सोपवण्यात येणार आहेत. त्यानंतर महिन्याच्या अखेरीस अथवा दि. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दोन जागा

जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय सदस्य संख्येच्या प्रमाणात स्वीकृत सदस्यपदांचे वाटप करण्यात आले आहे. सर्वाधिक १८ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यानुसार या पक्षांकडून सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

पराभूतांना स्वीकृतचा आधार

स्वीकृत सदस्यांच्या यादीत फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. भाजपच्या धनश्री लाड, शिवसेनेच्या विद्या मोटे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सतीश पवार यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. संतोष घनवट यांच्या पत्नी उर्मिला घनवट यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. या चौघांना आता स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे विठ्ठल साळुंखे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख हे दोन नवीन चेहरे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT