जत : दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीला जाब विचारल्याच्या कारणावरून पतीने सासू व मेहुण्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सिंगनहळ्ळी (ता. जत) येथे घडली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात संशयित सुधीर दादासाहेब काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुवर्णा सुधीर काळे (वय ३३, रा. सिंगनहळ्ळी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास संशयित सुधीर काळे दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नी सुवर्णा यांना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यामुळे त्यांनी आई भामाबाई हिवरे व भाऊ धुळदेव हिवरे यांना बोलावून घेतले. 'माझ्या बहिणीला मारहाण का करता?' असा जाब विचारल्याचा राग धरून सुधीरने घरातील चाकूने मेहुणे धुळदेव यांच्या कपाळावर वार केला. भाऊ धुळदेव यांना वाचवण्यासाठी सुवर्णा व त्यांची आई भामाबाई पुढे गेल्या असता, संशयिताने त्याच चाकूने सासू भामाबाई यांच्या हाताच्या बोटावर व पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास जत पोलिस करत आहेत.