सांगली : ठेकेदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर यामागील मूळ कारणांबाबत शासन, प्रशासनाकडून आत्मचिंतन होण्याची गरज होती. मात्र हर्षल मुख्य ठेकेदारच नाहीत, ज्या ठेकेदाराने त्यांना उप-ठेकेदार म्हणून नेमले, त्याची जबाबदारी आहे, अशी असंवेदनशील विधाने केली जात आहेत. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचा सूर समाजमाध्यमातून उमटतो आहे. मुख्य ठेकेदारानेच जर आत्महत्या केली असती, तर मग स्पष्टीकरण काय दिले असते? अशी विचारणा नेटकरी करत आहेत.
‘जलजीवन मिशन’अंतर्गत हर्षल पाटील यांनी तांदुळवाडी, कणेगाव, मालेवाडी, अहिरवाडी, पणुंब्रे तर्फ वारूण आणि चिंचोली येथे पाणीपुरवठा योजनेची कामे केलेली आहेत. या कामांची निविदा रक्कम 9 कोटी 67 लाख 93 हजार रुपये आहे. त्यापैकी त्यांना 6 कोटी 94 लाख 18 हजार रुपयांचे बिल मिळालेले आहे. 2 कोटी 73 लाख 75 हजार रुपयांचे बिल प्रलंबित आहे. हर्षल पाटील यांनी योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी कर्ज काढले होते. मात्र कामाची बिले वेळेवर मिळत नसल्याने ते तणावात होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केली. पण हर्षल मुख्य ठेकेदारच नाहीत. ठेकेदारांना उप-ठेकेदार नेमता येतो का? असा प्रश्न उपस्थित करून आत्महत्येच्या मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांपासून ते मंत्र्यांकडून होत आहे.
पणुंब्रे तर्फ वारूण येथील कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 44.42 लाख रुपये आहे. त्यापैकी 37.76 लाख रुपये कामांचे एमबी रेकॉर्डिंग झाले आहे. त्यापोटी 24 जून 2022 रोजी 8 लाख 6 हजार आणि 19 ऑगस्ट 2022 रोजी 15.11 लाख रुपये मुख्य ठेकेदाराला मिळाले. मुख्य ठेकेदाराने टीडीएस वजा जाता 2 जुलैरोजी 7.59 लाख आणि 22 ऑगस्ट 2022 रोजी 14.13 लाख रुपये उप-ठेकेदाराच्या बँक खात्यावर वर्ग केले. मात्र रखडलेल्या बिलाचे 14.58 लाख रुपये मुख्य ठेकेदारालाही मिळालेले नाहीत. त्यामुळे उप-ठेकेदार हर्षल यांनाही ही रक्कम मिळालेली नाही. काम पूर्ण होऊन वर्ष होऊन गेले तरी ही रक्कम शासनाकडून मिळालेली नाही.
जलजीवन मिशनअंतर्गत कामांची 19 कोटींची बिले निधीअभावी प्रलंबित राहिली असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील अधिकार्यांनी सांगितले. मात्र अनेक कामे पूर्ण झालेली आहेत, त्यांची बिले तयार केलेली नाहीत. ही बिले तयार झाली तर थकीत बिलांची रक्कम 50 कोटींपर्यंत जाईल, असे ठेकेदारांकडून सांगितले जात आहे. निधीचा दुष्काळ आहेच, पण कामे पूर्ण करूनही अधिकार्यांकडून बिल तयार होण्यास विलंब लागतो, अशी तक्रारही काही ठेकेदारांकडून होत आहे.
तांदुळवाडी येथे 2.63 कोटी रुपयांचे काम झाले आहे. त्यापोटी 1.28 कोटींचे बिल ठेकेदाराला मिळाले आहे. या कामाचे 64 लाख रुपयांचे बिल शासनाकडे प्रलंबित आहे. मालेवाडी येथील कामाचे 2.41 कोटींपैकी 1.79 कोटी रुपये बिल मिळाले आहे. 62 लाख रुपये थकीत आहेत. दरम्यान, शासनाकडून जशी रक्कम आली, तशी ती रक्कम उप-ठेकेदाराला दिली आहे. थकीत रक्कम वेळेत मिळायला पाहिजे होती, असे मुख्य ठेकेदाराकडून सांगितले जात आहे.
हर्षल पाटील यांनी सहा गावांमध्ये केलेल्या कामांच्या बिलांची सद्यस्थिती काय? आतापर्यंत किती रक्कम शासनाकडून आली, मुख्य ठेकेदाराला किती रक्कम मिळाली, उप-ठेकेदाराला किती रक्कम मिळाली, असा प्रश्न ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील अधिकार्यांना विचारला असता, हर्षल पाटील हे मुख्य ठेकेदार नाहीत, हे उत्तर पटकन मिळाले. कोणाला किती पेमेंट मिळाले, याची माहिती काढायला सांगतो, असे उत्तर अधिकार्यांनी काही उपप्रश्नांवर दिले. यावरून हर्षल पाटील यांची आत्महत्या होऊन तीन दिवस झाले, तरीही त्यांच्या कामांच्या बिलांची माहिती घेण्याची तसदी अधिकार्यांनी घेतली नसल्याचे स्पष्ट होते.