Gold  Pudhari
सांगली

Sangli Gold Theft: शिरगाव येथे बंद घरातून बारा तोळे सोने लंपास

शेजारी राहणाऱ्या महिलेवर तासगाव पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : शिरगाव (वि.) (ता. तासगाव) येथे शेजारी राहणाऱ्या महिलेने घर बंद असताना कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मूर्ती गोविंदराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा रोहित पाटील हिच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूर्ती पाटील हे कुटुंबासह शिरगाव येथे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी बँकेत गहाण ठेवलेले आई व पत्नीचे सोन्याचे दागिने सोडवून आणून घरातील कपाटात ठेवले होते. शेजारी राहणारी संशयित पूजा पाटील ही शासकीय दवाखान्यात सेविका असून तिचे पाटील यांच्या घरी येणे-जाणे होते. तीन तारखेला मूर्ती यांच्या मुलीला ताप आल्याने त्यांनी पूजा पाटील यांना घरी बोलावून औषध मागितले. मात्र तिने मुलीला जास्त ताप असल्याचे सांगत तासगाव येथील दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मूर्ती कुटुंबासह घराला कुलूप लावून मुलीला उपचारासाठी तासगावला घेऊन गेले.

दुपारी कुटुंब घरी परतले असता त्यांना घराचा पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. गडबडीत तो दरवाजा आतून बंद न करताच कुटुंबीय बाहेर पडले होते. संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन कपाटाची पाहणी केली असता, त्यातील ३० ग्रॅमचा नेकलेस, २० ग्रॅमच्या दोन बांगड्या, १६ ग्रॅमची कर्णफुले, २६ ग्रॅमचे गंठण, ५ ग्रॅमची अंगठी, १६ ग्रॅमची दोन मंगळसूत्रे आणि १० ग्रॅमची बोरमाळ असे एकूण १२ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. आठ दिवसांपूर्वी पूजा हिने गहाण ठेवलेल्या दागिन्यांबाबत विचारपूस केली होती. त्यामुळे तिनेच संधी साधून हे सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय मूर्ती पाटील यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT