विठ्ठल नलवडे
शिराळा ः शिराळा तालुक्यातील शिवणी व रेठरे धरणातील उपयुक्तपाणीसाठा पूर्णपणे संपल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. शेतीसाठी पाण्याचा पुरवठा ठप्प झाल्याने ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शिवणी धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्यामुळे कालव्यांना पाणी सोडणे अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी शिराळा, खेड व शिवणी परिसरातील शेतजमिनी कोरड्या पडत आहेत. या भागातील ऊस पिकांसाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यांचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही पाटबंधारे विभागाकडून कालव्यात पाणी सोडण्याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्तहोत आहे. शिवणी धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे 15 हेक्टर ऊस क्षेत्राला पाण्याचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
दरम्यान, वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेतून शिवणी धरणात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. एक दिवस पाणी सोडण्यात आले होते; मात्र त्यानंतर ते पुन्हा बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे 25 तलाव आटले असून बहुतांश धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मोरणा धरणात सध्या केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, हीच परिस्थिती कायम राहिल्यास मे अखेरपर्यंत शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.