वारणावती : मणदूर (ता. शिराळा) येथे गुरुवारी सकाळी धांदीचा मळा नावाच्या शेतात ऊस तोडणीचे काम करत असताना उसात दबा धरून बसलेल्या गव्याने लक्ष्मण रामू पाटील (वय 65) यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीत गव्याचे शिंग घुसल्याने दुखापत झाली आहे. त्यांना मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करून 108 रुग्णवाहिकेतून कराड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
घटना घडल्याबरोबर तत्काळ ग्रामस्थांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वारणावती वन्यजीव कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी, मणदूर सरपंच शोभा माने, पं. स. समिती सदस्या मनीषा पाटील, राम माने, वसंत पाटील, वाय. टी. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील घटनास्थळी आल्या. त्यांची ग्रामस्थांसोबत बैठक झाली. या बैठकीत मानवावर हल्ला करणाऱ्या गव्याला पुणे येथील रेस्क्यू टीमकडून रेस्क्यू करणे, तसेच उर्वरित शेतशिवारातील गवे हुसकावून जंगलात घालवणे, जंगलातून येणाऱ्या गव्यांसाठी तात्पुरते गेट बसवणे, अभयारण्याच्या कंपाऊंडबाबत पाठपुरावा करणे, मानवी वस्तीत वन्यजीव विभागाची पेट्रोलिंग यंत्रणा कार्यान्वित करणे व अभयारण्यातील मागील पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती देणे, तसेच दर महिन्याला ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांसमवेत बैठकीचे आयोजन करणे असे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.