शिराळा शहर : बिऊर (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षाच्या राजवीर हणमंत पाटील या चिमुकल्याने जीव गमावला. त्यानंतर वनविभागाने रात्रीचा दिवस करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वीस लाखांचे दोन अत्याधुनिक थर्मल ड्रोन यासाठी आणले असून त्याद्वारे बिबट्याच्या हालचाली टिपण्यात सुरुवात झाली आहे.
रात्रीच्या थंड वातावरणात उष्ण रक्ताचा जीवंत प्राणी फिरत असेल, तर तेथे लाल स्पॉट दिसतो. त्याला थर्मल ड्रोन कॅमेरा म्हणतात. याद्वारे गत 48 तासांपासून बिऊर, उपवळे, तडवळे परिसर रात्रीचा पिंजून काढला जात आहे. मात्र त्यात बिबट्या कुठेही आढळला नाही. दिवस उजाडला की बिबट्या लपून बसतो. नंतर अंधार पडताच तो बाहेर पडतो. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा थर्मल ड्रोन कॅमेऱ्याने त्याचा शोध घेत आहेत.
भक्ष्यासाठी बिबट्या येणार..
वनविभागाने बिबट्यासाठी सहा पिंजऱ्यांमध्ये बोकड ठेवले आहेत. त्याच्या वासाने तो येण्याची शक्यता आहे. दोन दिवस कर्मचारी शेतात थांबून आहेत. वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, युनुस मणेर, नामदेव सिद, संतोष कदम, गौरव गायकवाड, प्रतीक पोळ, पंकज कदम, कोल्हापूर येथील रेस्क्यू पथकाचे अमोल चव्हाण विनायक माळी, ओमकार पाटील हे रात्रीचा दिवस करत आहेत.