आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने पेटवून दिल्याने गंभीर भाजलेल्या निरपराध वृद्धेचा अखेर बळी गेला. अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्यानंतर जिवंत पेटवून देण्यात आलेल्या मालन मारुती जाधव (वय ७८) यांचा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शेटफळे गावासह संपूर्ण आटपाडी तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मालन जाधव या शेटफळे येथे घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. घराजवळच आजूबाजूला त्यांचे नातेवाईक राहतात. ३० जून रोजी पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्या पुन्हा घरात येत असताना, आधीच दबा धरून बसलेल्या चोरट्याने त्यांच्या मागोमाग घरात प्रवेश केला. त्याने वृद्धेवर जबर हल्ला चढवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्याच्या किंवा प्रतिकार संपवण्याच्या उद्देशाने त्याने वृद्धेला जिवंत पेटवून दिल्याचा प्राथमिक संशय आहे.
या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या मालन जाधव यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेटफळे गावावर रात्रीच शोककळा पसरली.
या धक्कादायक प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मालन जाधव यांचे पुत्र विठ्ठल मारुती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धेच्या मृत्यूनंतर आता या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचे कलम वाढविण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. सांगली जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि काही संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, एका असहाय वृद्ध महिलेला लक्ष्य करून चोरीसाठी क्रूरपणे जिवंत जाळण्याच्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. घटनेला काही दिवस उलटूनही संशयित अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवून कठोर कारवाई करावी, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.