Sangli Municipal Corporation | File Photo
सांगली

Sangli News| शेरीनाल्यासाठी ५० कोटींची तरतूद करावी लागणार

आयुक्त संजीता महापात्र : मूर्ती विसर्जन, कमी पाण्यामुळे नदीतील पाण्याला हिरवट रंग

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शेरीनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पासाठी ९३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. आता केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंडातून या योजनेसाठी निधीची मागणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला स्वहिश्श्यापोटी सुमारे ५० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशमूर्ती विसर्जनामुळे तसेच नदीतील पाणीपातळी अतिशय कमी झाल्याने व ते साचून राहिल्याने पाण्याचा रंग हिरवट झाला आहे, असे आयुक्त संजीता महापात्र यांनी सांगितले. शेरीनाल्याचे सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ऐन गणेशोत्सवातही शेरीनाल्याचे दूषित पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने विसर्जनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेरीनाल्यावरील चारही पंप काही महिन्यांपासून बंद आहेत. यासंदर्भातील प्रश्नावर आयुक्त महापात्र म्हणाल्या, शेरीनाल्यावरील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ९३ कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. आता हा प्रकल्प केंद्रशासनाच्या अर्बन चॅलेज फंडातून करण्यात येणार आहे. या निधीतून शासनाकडून ५० टक्के निधी मिळणार आहे. तर महापालिकेला ५० टक्के निधीची तरतूद करावी लागणार आहे. शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यावर आपला भर आहे.

गणेशोत्सवापूर्वी नदीचे पाणी हिरवट नव्हते. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर पाण्याचा रंग बदलला. त्यात पाणी पातळी कमी झाल्याचा व पाणी वाहते नसल्याचाही मोठा परिणाम झाला आहे. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याने कमी कमी होईल. दरम्यान, शेरीनाल्याचे सांडपाणी नदीपात्रात जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

शेरीनाला, सोलर प्रकल्प कर्जरोख्यातून

महापालिकेच्या कर्जरोख्यातून शेरीनाला प्रकल्प तसेच सोलर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सोलर प्रकल्पामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. सध्या ठेकेदारांची बिले व इतर देणी भागविली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT