Leopard Rescue 
सांगली

Sangli Leopard Rescue: शेडगेवाडीतील बिबट्या अखेर जेरबंद

वन विभाग व पुणे रेस्क्यू टीमच्या संयुक्त मोहिमेला यश

पुढारी वृत्तसेवा

कोकरूड : शेडगेवाडी (ता. शिराळा) परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून मुक्तसंचार करून ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर बुधवार, दि. ९ सप्टेंबररोजी रात्री साडेआठच्या सुमारास जेरबंद करण्यात वन विभाग व पुणे येथील 'रेस्क्यू' टीमला यश आले.

गेल्या काही दिवसांपासून शेडगेवाडीच्या मुख्य बाजारपेठेसह माध्यमिक विद्यालय, नागरी वस्त्या आणि परिसरातील शेतांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत होता. दिवसा तसेच रात्री बिबट्याच्या हालचाली दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. विशेषतः शाळकरी मुले, शेतमजूर, महिला आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

बिबट्याने परिसरातील कुत्रे, मांजरी आणि कोंबड्यांना भक्ष्य बनवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्याचा वावर 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांमध्येही कैद झाला होता. त्यामुळे बिबट्याला तातडीने पकडण्याची किंवा त्याचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी केली जात होती.

सकाळपासूनच शोधमोहीम

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच वन विभागाच्या पथकाने पुणे येथील विशेष 'रेस्क्यू' टीमच्या मदतीने व्यापक शोधमोहीम सुरू केली होती. बिबट्याच्या संभाव्य हालचालींच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. झाडी, शेत परिसर, जनावरांचे गोठे तसेच वस्तीच्या आसपासच्या भागात पथकाने दिवसभर शोध घेतला. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास 'हॉटेल स्वराज'च्या पाठीमागे असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये बिबट्या घुसल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

चाहूल लागताच पलायन

बिबट्याला पकडण्यासाठी पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने जाळे टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, मानवी चाहूल लागताच बिबट्याने शेडमधून बाहेर पडून शेताच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर रेस्क्यू टीमने तात्काळ संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम अधिक तीव्र केली. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले. टीमने बिबट्याला डार्ट (बेशुद्धीचे इंजेक्शन) मारून सुरक्षितपणे जेरबंद केले. बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्याला पिंजऱ्यात टाकून सुरक्षित स्थळी हलवले आहे.

ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा श्वास

गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याच्या छायेखाली असलेल्या ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला. बिबट्या जेरबंद झाल्याने शाळकरी मुले, महिला, शेतकरी तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT