रविकांत जोशी
सांगली : येथील हरिपूर रस्त्यावरील शास्त्री चौक ते लिंगायत स्मशानभूमी यादरम्यानच्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु कामाला गती नसल्याने लोकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे.
हरिपूर रस्त्याचे काम झाले. परंतु प्रशिक चौक ते लिंगायत स्मशानभूमी या रस्त्याचे काम मात्र रेंगाळले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम करीत असताना आडव्या पाईपलाईन्स आणि इतर केबल्स टाकण्यात आल्या आहेत. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच या पाईप्स खचू लागल्या आहेत. प्रत्येक गल्लीच्या समोरील पाईप फुटल्यामुळे परिसरात पाणीपुरवठा अपुरा होत आहे. प्रशासनाच्या या कामामुळे मूलभूत सुविधांचाच बोजवारा उडाला आहे. शौचालयाची दुरवस्था आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात शास्त्री उद्यान मागील बाजूस नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृह उपयोग होण्याऐवजी नागरिकांना त्याचा त्रास अधिक होत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खड्डे काढल्यामुळे घरात जाण्यासाठी केवळ चिंचोळी पायवाट शिल्लक राहिली आहे.
तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. महापालिका प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.